राष्ट्रवादी पक्ष फुटीला आपला पुतण्याच जबाबदार आहे हे माहित असून सुध्दा दुसऱ्याकडे बोट दाखवणे पवारांना शोभत नाही.
वास्तविक त्यांनी बीडच्या सभेत अजित पवार यांच्यावर टिका केली असती तर ती उपस्थितांना भावली असती.
बीड (प्रतिनिधी): बोले तैसा चाले या भूमिकेतून गेली ५० वर्ष बीड जिल्ह्याचे राजकारण करणाऱ्या शिवाजीराव पंडित यांच्या कुटुंबाने मधले पाच वर्ष सोडले तर कायम शरद पवार यांना तन-मन-धनाने साथ दिली. पवारांनी सुध्दा नेहमी आशिर्वाद दिले. परंतु घरातच उभी फुट पडल्यामुळे भविष्याचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागले. तरी देखील शरद पवार यांच्या विषयी पंडित कुटुंबातील कोणीही चकार शब्द काढला नाही. असे असताना बीड येथील सभेत पवारांनी अमरसिंह पंडित यांच्या विषयी थेट नाव घेवून जी टिका केली त्यामुळे पंडित घराण्याला मानणाऱ्या मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शरद पवार आणि अजित पवार हे दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर अजित दादांच्या वयोगटातील जवळपास सर्वच नेते हे दादांसोबत गेले. कारण त्यांना भविष्याची चिंता होती. दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते सुध्दा याच भावनेतून दादांसोबत राहिले, जे काही शिल्लक नेते मुळ पक्षात राहिले त्या प्रत्येकाचे वेगवेगळे कारणं आहेत. ही फुट घरातून पडली असल्यामुळे त्याला कोणीही बाहेरचा नेता जबाबदार नाही हे स्पष्ट आहे. असे असताना शरद पवार यांनी सुरुवातीला छगन भुजबळ यांच्या मतदार संघात जावून आव्हान दिले. नंतर बीड जिल्ह्यात येवून अमरसिंह पंडित यांना आव्हान दिले. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीचा आणि पंडितांचा सुतराम संबंध नाही. पवार साहेबांचे वय झाले आहे असे विधान अमरसिंह पंडित यांनी कुठेही केलेले नाही. गेवराई मतदार संघाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून पंडितांनी फक्त कुस बदलली पक्ष नव्हे. हे करताना पवार साहेबां विषयी असलेला आदर सुध्दा कायम ठेवला. परंतु काहीही कारण नसताना सगळ्यांना सोडून दिले आणि ज्या घराणे ४५ वर्ष प्रामाणिकपणे निष्ठा जपली त्यांच्याच निष्ठेवर संशय घेण्याचे काम पवारांनी केले. पक्ष फुटीला आपला पुतण्याच जबाबदार आहे हे माहित असून सुध्दा दुसऱ्याकडे बोट दाखवणे पवारांना शोभत नाही. वास्तविक त्यांनी बीडच्या सभेत अजित पवार यांच्यावर टिका केली असती तर ती उपस्थितांना भावली असती. परंतु अजित माझा पुतण्या आहे. मी कुटुंब प्रमुख आहे आम्ही भेटत राहणार असे म्हणायचे आणि अजित दादांबरोबर पक्ष वाढीचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्यांना दोष द्यायचा ही कुठली निती? बीड जिल्ह्यातील मराठा आणि तमाम बहुजन समाज 'शिवछत्र'ला दैवता समान मानतो. या घराण्याने आजपर्यंत हजारो कुटुंबाला उभे केले आहे. त्यांच्यावर टिका केल्यामुळे नुकसान पंडितांचे नाही तर पवारांचे झाले आहे. जी काही थोडी सहानुभूती त्यांच्या विषयी होती ती सुध्दा त्यांनी गमावली आहे.