संस्कार जपले तर संस्कृती टिकेल - सुनीलकुमार सोळंके
स्व.मदनलाल चतुरमोहता यांच्या पुण्यस्मरणार्थ व्याख्यान संपन्न
गेवराई - दि . ९ (प्रतिनिधी) -आजच्या बदलत्या युगात घराघरात वादाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यावर कुठेतरी बंधन यायला हवं . यासाठी घराघरात संवाद झाले पाहिजेत . संवाद झाले तर वाद होणार नाहीत. जे पेरलं तेच घरात उगवत असत म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात संस्कार जपले तरच संस्कृती टिकेल ,असे प्रतिपादन मानसशास्त्र तज्ज्ञ व्याख्याते सुनीलकुमार सोळंके यांनी केले.
गेवराई येथील स्व.मदनलाल चतुरमोहता यांच्या १३ व्या पुण्यस्मरणार्थ पारिवारिक संस्कार या विषयावर व्याख्यानाच्या आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ.विजय सिकची, ऍड. एम.एस. इंदानी, ऍड. राजेंद्र राक्षसभुवनकर, नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, लोकशाचे एम.डी. रोशन बंब पत्रकार प्रा राजेंद्र बरकसे ,सुभाष मुळे, शिवाजी ढाकणे, भागवत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत गौतमसेठ चतुरमोहता, हेमचंद चतुरमोहता, गणेशसेठ चतुरमोहता, पारससेठ चतुरमोहता व राजाश्रेणिक चतुरमोहता आदिंनी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्या मुलांवर लहान पणापासूनच चांगले संस्कार करा, घरात वाद होऊ नये म्हणून प्रत्येकासोबत संवाद झाला पाहिजे. कारण ज्या घरात मनमोकळे संवाद आहे तिथे वाद होत नाहीत. बदलत्या काळानुसार नक्की चाला पण संस्कार कुठेच कमी पडू देऊ नका. कितीही मोठ्या पदावर गेलात तरी जुन्या परंपरा कायम ठेवा .तेच संस्कार आपल्या कमी येतील. म्हणून म्हणून सांगतो की संस्कार जपले तर संस्कृती टिकेल नसता तुमच्या जीवनाला काहीच अर्थ राहणार नाही ,असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान चतुरमोहता परिवाराच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमाबद्दल तोंडभातून कौतुक केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन वैशाली पाटील यांनी केले तर शेवटी गणेश चतुरमोहता यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.