आता नेतृत्व आघाडी समुदायाची एड्स संपवण्याच्या दिशेने वाटचाल - सुहास कुलकर्णी
अट्टल महाविद्यालयात एड्स जनजागृती रॅली आणि व्याख्यान संपन्न
गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल महाविद्यालय, गेवराई, जिल्हा बीड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष, जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गेवराई शहरातून पाचशे विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सहभाग असलेली 'एड्स जनजागृती रॅली' आयोजित करण्यात आली होती. आठवडी बाजार भरलेल्या गर्दीच्या ठिकाणी रॅलीच्या माध्यमातून एड्स नियंत्रणाचा संदेश देण्यात आला.
लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बस स्थानक मार्गे रॅलीचा समारोप अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहामध्ये करण्यात आला. यावेळी 'एड्स प्रतिबंधामध्ये युवकांची भूमिका' या विषयावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, बीडचे सुहास म कुलकर्णी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे होत्या. युवकांवर एड्स निर्मूलनाची आणि नियंत्रणाची जबाबदारी देताना विद्यार्थी व युवकांनी एड्स जनजागृतीमध्ये संदेश वाहक म्हणून काम करणे अपेक्षित आहे आणि समाजाला शिक्षित करणे गरजेचे आहे असे अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी सांगितले.
यावेळी मंचावर उपप्राचार्य मेजर डॉ. विजय सांगळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक, कार्यक्रमाधिकारी चंद्रकांत पुरी, गेवराई उपजिल्हा रुग्णालयाचे विक्रम तिडके यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. समाधान इंगळे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. तर कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुदर्शना बढे. प्रा. अरुण जाधव यांच्यासह महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Marathwada News
Shaikh jawed Sir 📱9595713313 /9422027313