गेवराई मधील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा शब्द धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी द्यावा
गेवराईतील मतदार या निवडणुकीत तेवड्याच ताकतीने पंकजाताईच्या पाठिशी उभे राहुन त्यांना सार्वाधिक मताधिक्याने निवडुन देतील असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला.
गेवराई दि.20 (शेख जावेद) गेवराई मधील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचा शब्द धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी द्यावा, गेवराईतील मतदार या निवडणुकीत तेवड्याच ताकतीने पंकजाताईच्या पाठिशी उभे राहुन त्यांना सार्वाधिक मताधिक्याने निवडुन देतील असा विश्वास अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. अमरसिंह पंडित यांचे शास्वत शेतीचे स्वप्न साकार करुन सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंकजाताईंना लोकसभेत पाठवा असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. आदरणीय शिवाजीराव दादांनी मला मोकळ्या मनाने विजयाचा आशिर्वाद दिला असुन मतदारांचे आशिर्वाद आणि शिवछत्र परिवाराची साथ मला गेवराई विधानसभा मतदार संघातुन सर्वाधिक मताधिक्य मिळवुन देईल असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांनी गेवराईतील सिंदफणा नदीवरील बॅरेजसह पाझर तलावाचे साठवण तलावातील रुपांतर व राक्षसभुवन येथील बंधारा अशी सर्व कामे वर्षभरात मार्गी लावु असा शब्द देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटात प्रतिसाद दिला. पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ विजयसिंह पंडित यांनी गेवराई येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.
बीड लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बुथ प्रमुख व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे, उमेदवार पंकजाताई मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे, भाजपा महिला आघाडीच्या मिनाक्षी पाटील, समीर शेख, भाऊसाहेब नाटकर, मुजीब पठाण, विकास सानप, फुलचंद बोरकर, कुमारराव ढाकणे, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, सुभाष महाराज नागरे सह आदी मान्यवर व्यसपीठावर उपस्थित होते. मेळाव्यात अशोक शिंदे, गजानन काळे, श्रीराम आरगडे, सय्यद समीर, अनिल तुरुकमारे, मिनाक्षी पाटील, सुभाष नागरे आदींची भाषणे झाली. मेळाव्याचे प्रास्ताविक करतांना विजयसिंह पंडित म्हणाले की, स्थानिक पातळीवरील राजकारण बाजुला ठेवुन महायुतीचा धर्म पाळत पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी मनात कोणताही किंतू परंतू न ठेवता कामाला लागावे. शिवछत्र परिवार शब्द पाळणारा परिवार आहे, या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवुन द्यायची वेळ आली आहे. जातीपातीचा विचार न करता विकासाच्या मुद्यावर काम करण्याची शिकवण शिवाजीराव दादांनी आम्हाला दिली आहे. त्यामुळे सुजान मतदार विकासाच्या पाठिशी राहुन मतदान करेल असा विश्वास व्यक्त करतांना ही निवडणुक विधानसभेची बांधणी असल्यामुळे सर्वांनी आपले बुथ भक्कम करुन पंकजाताईंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलतांना अमरसिंह पंडित म्हणाले की, तुम्ही आम्हाला सिंदफणा पाणीदार करुन तालुक्यातील सिंचन व्यवस्था वाढविण्याचा शब्द द्या, गेवराईकर तुम्हाला मताधिक्य देतील. ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही बीडची ओळख पुसण्यासाठी सिंचनासोबतच शेतीमालाला योग्य भाव देण्याची मागणी त्यांनी केली. आम्ही तुमचे सख्ये नाहीत, आम्ही राष्ट्रवादीचे असलो तरी तुमच्या सख्यांपेक्षा जास्तीचे मताधिक्य देवू, आमच्यावर विश्वास ठेवा असे सांगतांना अमरसिंह पंडित यांनी सिंदफणा नदीवरील नाथापूर, खुंड्रस, दगडगांव, इरगांव, टाकळगांव, ईटकुर, अंकुटा, निमगांव मायंबा आणि बिंदूसरा नदीवरील नामलगांव को.प.बंधार्याचे निम्न पातळी बंधार्यात रुपांतर करणे, गोदावरी नदीवरील राक्षसभुवन (शनीचे) येथे पुलवजा निम्न पातळी बंधार्याचे काम, तांदळा येथे नवीन साठवण तलाव आणि चकलांबा, पाचेगांव, सुलतानपूर, भारतळ (जातेगांव), सिंधीखोरी या पाझर तलावांचे साठवण तलावात रुपांतर करणे ही कामे वर्षभरात पुर्ण करण्याचा शब्द धनंजय मुंडे आणि पंकजाताईनी द्यावा अशी मागणी केली. आपल्या भाषणात त्यांनी शेती, सिंचन, अल्पसंख्यांक आदींच्या प्रश्नांवर भाष्य केले.
विकासाची ब्ल्यू प्रिंट अमरसिंह पंडित यांच्याकडे तयार आहे, शास्वत शेतीसह सिंचनावर त्यांचा अभ्यास आहे. त्यांनी मागणी केलेली कामे वर्षभरात पुर्ण करण्याचा शब्द देतो परंतू गेवराईकरांनीही या निवडणूकीत मोठे मताधिक्य पंकजाताईंना द्यावे असे आवाहन करतांना पालकमंत्री धनंजय मुंडे पुढे म्हणाले स्वत:ला शेतकरी पुत्र म्हणवनारे कशाची शेती करतात हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासाच्या मुद्यावर राजकारणात जातीपातीच्या पुढे जावुन विचार केला पाहिजे. जिल्ह्याचा खासदार कसा असावा हे मतदारांनी ठरवले आहे. अमरसिंह पंडित यांच्यासारख्या भावाचे शास्वत शेतीचे स्वप्न साकार करण्यासाठी पंकजाताईंना लोकसभेत पाठवा. शिवछत्र पाठीशी असल्यामुळे पंकजाताईचा विजय कोणीही रोखु शकणार नाही असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टिका केली. विजयसिंह पंडित यांच्या नियोजनाचे कौतुक करुन त्यांना विधानसभेत पाठविण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीपासुन तयारी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवछत्र परिवाराने आयोजित केलेला बुथ प्रमुखांचा मेळावा विजयाकडे घेवुन जाणारा आहे, येत्या १३ मे ला मताच्या रुपात कर्ज द्या, विकासाच्या रुपात त्याची मी फेड करेल. शिवछत्र परिवाराचे आशिर्वाद आणि मुंडे साहेबांचे संस्कार यातुन विकास कामे करण्याचे वचन देते असे सांगतांना पंकजाताई म्हणाल्या अफवांना बळी पडु नका, अतिशय खालच्या पातळीवर जावुन अपप्रचार सुरु आहे त्याला उत्तर सुद्धा देण्याची गरज मला भासत नाही. बीड जिल्ह्याचे नाव मोठे करण्यासाठी आजवर प्रयत्न केले भविष्यातही जनतेची सेवा करण्यासाठी काम करेल. अमरसिंह पंडित यांनी मांडलेली सिंचनाची कामे नक्की पुर्ण होतील असा शब्द पंकजाताई मुंडे यांनी यावेळी दिला. बीड जिल्ह्यात अद्यावत हॉस्पिटल, मेडीकल कॉलेज आणि दहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळेल असा प्रकल्प भविष्यात उभारणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
गेवराई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याला बुथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. उपस्थितांनी दोन्ही हात वर करुन पंकजा मुंडे यांच्या विजयाची ग्वाही दिली. विजयसिंह पंडित यांनी आयोजित केलेल्या या मेळाव्यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघात पंकजाताई मुंडे यांच्या विजयाचे वारे वाहु लागल्याचे चित्र दिसत होते.